पुणे – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलने आपली तक्रार मागे घेतली आहे. त्याबाबत पुण्यात बैठकीसाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडेबाबत भरभरुन बोलले
धनंजयला राष्ट्रवादीने संधी दिली, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. संधीचं सोनं केलं. विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताने निवडून आले. पंकजा मुंडेंसारख्या कॅबिनेट मंत्र्यांचा त्यांनी पराभव केला. पवारांनी महत्त्वाच्या खात्याचा भार दिला. ते काम करत होते. बहुजन समाजातून आलेला नेता. मात्र त्या प्रकरणात धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी पक्षाची मोठी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. महिलेने तक्रार मागे घेतली हे मला कळाले. बातमी आल्यानंतर सगळ्या मीडियाने लावून धरली होती. अशा आरोपामुळे त्या लोकांची बदनामी होते. विरोधक या विषयाचा मुद्दा करतात. बहुजन समाजातून आलेल्या नेत्यांना त्रास झाला. धनंजय मुंडे यांना भयंकर त्रास झाला. पक्षाला सुद्धा याचा त्रास झाला. यापूर्वी राष्ट्रवादी युवकांची सुद्धा बदनामी केली.
एखादा व्यक्ती राजकारणात, समाजकारणात काम करु लागला, तर त्याचं नाव लोकांत चांगलं होण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं. असे आरोप झाल्यावर एका झटक्यात माणूस बदनाम होतो, विरोधक बोट ठेवतात. महिला संघटना आंदोलनं करतात, राजीनामा मागितला जातो. ज्यांनी ज्यांनी ही मागणी केली, धनंजयसंबंधात वक्तव्य केली, माहिती न घेता मागणी केली, त्याला जबाबदार कोण? असा सवाल अजित पवार यांनी केला.