मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता आणि कर्जाची माहिती चुकीची दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या आरोपानंतर निवडणूक आयोगाने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसला (CBDT) या नेत्यांच्या प्रतिज्ञापत्राची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. संपत्ती आणि देणेदारीची अर्धवट किंवा चुकीची माहिती दिल्याने या नेत्यांना चौकशीला सामोरे जावे लागू शकते.
नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, या नेत्यांविरोधात गुजरातचे आमदार नाथाभाई ए पटेल यांनी याबाबत तक्रार केली आहे. संदर्भात महिनाभरापूर्वी निवडणूक आयोगाकडे तक्रार आली होती. याबाबत एक स्मरणपत्रही पाठविण्यात आले होते.
2013 मध्ये निवडणूक आयोगाने निर्णय घेतला होता की उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी सीबीडीटी करेल. नियमांनुसार, जर आरोप प्राथमिकदृष्ट्या खरे आढळल्यास रिप्रजेटेंशन ऑफ पिपल अॅक्टच्या कलम125 अ अंतर्गत तक्रार दाखल होते. या प्रकरणात 6 महिने कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही होऊ शकते.