पुणे: स्वतंत्र विदर्भाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही. अशी टीका काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. आता भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी या टीकेला प्रत्युउत्तर देताना म्हणाले की, ‘महसूल मंत्री’ पदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे, गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय ओबीसी आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर, भाजपकडून रस्त्यावर उतरुन जेल भरो आणि चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले असून, यामुळे ओबीसींचे मोठे राजकीय नुकसान होणार, अशी आंदोलनामागची भूमिका भाजपने सांगितली.
दरम्यान, नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. यावेळी, फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरादार हल्ला चढवला. विशेष करून त्यांनी काँग्रेसला आपल्या टीकेचं लक्ष्य केलं. “ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे,” असं म्हणत त्यांनी, “माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिलीत, तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन,” अशी सिंहगर्जना फडणवीसांनी केली होती.
सत्तेसाठी काहीही बोलायचं-बाळासाहेब थोरात
काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निशाणा साधला असून, “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं, तुम्ही फार गांभीर्याने घेतलंत. ते हे देखील म्हणाले होते, “स्वतंत्र विदर्भाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, त्यानंतर आता, हे ओबीसी आरक्षण दिलं नाही, तर संन्यास घेईन, असं म्हणत आहेत. तुम्ही एक लक्षात घ्या, बोललेल्यापैकी त्यांनी काही केलेलं नाहीये”, असा खोचक टोला त्यांनी लगावला होता.
तसेच, “सत्तेसाठी काहीही बोलायचं आणि सत्ता अलीकी मात्र काहीही करायचं नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा पायंडा आहे. सामान्य नागरिकांना फसवणं आणि सत्ता उपभोगणं हाच उद्देश ठेवून, त्यांच्याकडून अशी वक्तव्य केली जातात. त्यामुळे, त्यांनी केलेल्या घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही,” असा शब्दांत त्यांनी फडणवीसांच्या गर्जनेवर मत व्यक्त केलं आहे.