पुणे – उद्योजक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) पुन्हा एकदा छापा टाकला आहे. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी उद्योजक अविनाश भोसले यांची नोव्हेंबर महिन्यात मुंबईत 2 वेळा ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आज पुण्यात एबीआयएलया विद्यापीठ रस्त्यावरच्या भोसले यांच्या कार्यालयात ईडीची टीम सकाळी 8.30 पासून तपासाकरता पोहोचली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ED च्या फेऱ्यात चौकशीला सामोरे जात असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ED ने छापा टाकलाय. सकाळी साडे आठ वाजताच ईडीचं पथक पुण्यातील ABIL या कार्यालयात दाखल झालं. केंद्रीय सुरक्षा दलाच्या गार्डचा पहारा सध्या या कार्यालयात आहे. विदेशी चलन प्रकारात चौकशी सुरु असताना ईडीचं पथक थेट पुण्यात तळ ठोकून बसल्याने, भोसले यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
अविनाश भोसले यांची यापूर्वीही ईडीने चौकशी केली होती. नोव्हेंबर महिन्यात तब्बल दहा तास त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. FEMA कायद्यांतर्गत त्यांची चौकशी करण्यात आल्याचं वृत्त आहे. यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील 23 ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या.
तर काही दिवसांपूर्वी गौरी अविनाश भोसले यांची देखील ईडीने चौकशी केल्याचे समोर आले होते. अविनाश भोसले यांनी परदेशातील वेगवेगळ्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बेकायदा पद्धतीने भारताबाहेर पैसा पाठवल्याचा संशय ईडीला आला. या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी अविनाश भोसले यांच्या पत्नी आणि राज्यमंत्री विश्वजीत पतंगराव कदम यांच्या सासूबाई गौरी भोसले यांची चौकशी झाली.
अविनाश भोसले यांच्यासह त्यांच्या मुलीला म्हणजेच राज्याचे कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांनाही ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती आहे. दोन आठवड्यापूर्वीच हे वृत्त आलं होतं. मात्र याबाबत विश्वजीत कदम यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
कोण आहेत अविनाश भोसले?
अविनाश भोसले यांचा रिक्षा चालक ते व्यावसायिक प्रवास फार वेगानं आणि थक्क करणारा होता. त्यानंतर त्यांचा बांधकाम व्यवसायाशी संबंध आला आणि ते सरकारी कंत्राटदार बनले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आज ते कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. पुण्यात त्यांना रिअल इस्टेट किंग म्हणून ओळखले जाते. पुण्याच्या बाणेर येथे भोसले यांचा पॅलेस आहे. व्हाईट हाऊस असं त्याचं नाव आहे. सफेद रंगाच्या या पॅलेसचा लूक अमेरिकेच्या व्हाईट हाऊस सारखाच आहे.
मात्र या प्रवासात 2007 मध्ये अडथळा आला. 2007 मध्ये मुंबई विमानतळावर पहिल्यांदा अविनश भोसले यांना अडवण्यात आलं. त्यांनी कस्टम ड्युटी न भरता अनेक वस्तू विमानतळाबाहेर नेत असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. 2017 म्हणजे 10 वर्षांनंतर इन्कमटॅक्स विभागानं त्यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी अविनाश भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यानंतर त्यांच्यामागे EDचा ससेमिरा सुरू झाला.
दरम्यान, केंद्र सरकारच्या अंतर्गत २००५ पासून कार्यरत असलेला ईडी हा एक जबाबदार विभाग आहे, आता तर सीबीआयपेक्षाही ईडीकडे जास्त अधिकार आल्याचं दिसत आहे. आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांना पायबंद घालणे हे ईडीचे काम आहे. याच ईडीने आत्तापर्यंत अनेक राजकीय दिगज्जांचा देखील पाठपुरावा केला आहे. राज ठाकरे, शरद पवार ते संजय राऊत यांसारख्या अनेक नेत्यांना ईडीने समन्स बजावले मात्र अविनाश भोसलेसारख्या उद्योजकाला ईडीचा ससेमिरा अनेक वर्षांपासून चालू असून राजकीय नेत्यांचा पिच्छा करणारी ईडी बिल्डरच्या देखील मागे असल्याने अविनाश भोसले यांच्या या घोटाळ्यात राजकीय हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईडीचं पथक पुण्यातील ABIL या कार्यालयात दाखल झाल्याने या ABIL चा राजकीय नेत्यांशी तर काही संबंध नाही ना? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.