मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीकडून छापेमारी सुरु आहे. त्यांचे सुपूत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने छापेमारी कारवाई सुर आहे. मात्र या छापेमारीमगच कारण अद्याप अस्पष्ट आहे.
आज सकाळी आठ-साठे आठच्या सुमारास ईडीची तीन पथकं तपासासाठी पोहोचली. त्यांनी आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे दोन पुत्र आणि त्यांच्या कार्यालयात तपास सुरू केला. ईडी नेमक्या कोणत्या प्रकरणात तपास करत आहे, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्या सरनाईक पिता पुत्र देशाबाहेर असल्याचं समजतं. सरनाईक यांच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना ईडीनं बोलावलं आहे. शिवसेनेच्या इतर काही नेत्यांनादेखील ईडीकडून नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचं समजतं.
प्रताप सरनाईक यांच्या घरी, कार्यालयात ईडीचे अधिकारी पोहोचल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ‘मनी लॉण्ड्रिंगसारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहेत. त्यांचे मुखिया यामध्ये अग्रेसर आहेत. त्यामुळे मला याबद्दल कोणतंही आश्चर्य वाटत नाही. मुंबई महापालिकेत माफिया राज असल्याचा आरोप मी आधीही केला आहे. पालिकेतून कंत्राट, भागिदारीतून प्रचंड पैसा येत असतो,’ याकडे त्यांनी लक्ष वेधलं.