मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश जवळपास निश्चित झाला असल्याचे सांगितले जात आहे. मागील काही दिवसांपासून खडसे सातत्याने भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. तसेच त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांबद्दल अनेकदा उघड नाराजी देखील व्यक्त केली होती. आता ते लवकरच राष्ट्रवादीच प्रवेश करण्याची शक्यता आहे.
यातच एकनाथ खडसे सध्या कोणाच्या संपर्कात आहेत, याबद्दल मला माहिती नाही. मात्र ते पक्षांतर करतील हे सत्य आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते तथा सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी जळगावात केले होते.
याशिवाय आज जामनेर येथील एका कार्यक्रमाला खडसे देवेंद्र फडणवीसांसोबत उपस्थित असतील की नाही याविषयी देखील चर्चा रंगल्या आहेत. ‘एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले तर आनंद होईल’ असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होते. त्याचबरोबर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा, खडसे यांनी शिवसेनेत यावे असे म्हटले होते.