मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या वतीने विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली. राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सातत्याने धुसफुस सुरू आहे, यातच ही यादी राज्यपालांकडे सोपविण्यात आली आहे. राज्यपाल यातील काही नावे फेटाळण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. यातच आता या आमदारांची नावे राज्यपालांनी जाहीर करावीत, असे आवाहन शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, कोश्यारी यांनी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी जाहीर करावी. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीने देखील सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
चंद्रकांत पाटील आणि राज्यपालांच्या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यपालांची भेट कुणीही घेऊ शकतो.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना सोपवलेल्या यादीत एकनाथ खडसे, उर्मिला मातोंडकर, सचिन सावंत, आनंद शिंदे यांची देखील वर्णी लागली आहे.