मुंबई : राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा पत्र लिहित मराठी विरुद्ध कन्नड भाषिक हा वाद टाळण्याची विनंती केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील पिरणवाडी या गावात शिवाजी महाराज आणि संगोळी रायान्ना यांच्या पुतळ्यावरून वाद सुरू झाला आहे.
#बेळगाव जिल्ह्यातील पिरणवाडी गावातील मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांकडून झालेल्या अन्यायकारक हल्ल्याप्रकरणी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री श्री. @BSYBJP यांना पत्राद्वारे जाहीर निषेध व्यक्त करत आहे…#Karnataka #Piranwadi @CMofKarnataka pic.twitter.com/nRyGke2W9Y
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 28, 2020
मराठी भाषिकांचा विरोध असतानाही येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यासमोरच संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसविण्यात आला व या चौकाचे नाव बदलण्याची मागणी सुरू आहे. याचा विरोध करणाऱ्या मराठी भाषिकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना समोर आली होती. या घटनेवरून एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा पत्र लिहित या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
एकनाथ शिंदे यांनी पत्रात म्हटले की, संगोळी रायान्ना यांचा पुतळा उभारण्यास मराठी भाषिकांचा विरोध नाही. मात्र जाणीवपुर्वक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हा पुतळा उभारला जात आहे व चौकाचे नाव बदलण्याची मागणी करण्यात येत आहे. मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांकडून अन्यायकारक लाठीचार्ज झाल्याने समस्त मराठी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मराठी भाषिक विरुद्ध कन्नड भाषिक वाद पेटणार नाही याची काळजी कर्नाटक सरकारने घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली.