इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली. २०१८ मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली.
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलतानाही गोस्वामी यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. त्यांनी शरीरावरील मारहाणीच्या खुणाही प्रसारमाध्यमांसमोर दाखवल्या. या वेळी गोस्वामी हे अनवाणीच होते. पोलिसांनी मला येथे अनवाणीच आणले, असा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले की, पोलिसांनी मला घेरले आणि माझी मान पकडली. त्यांनी मला ढकलले. मला मारहाण करण्यात आली. पोलिसांना मला अनवाणीच आणले आहे.
विशेष म्हणजे गोस्वामी यांच्यासमोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गोस्वामी यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोस्वामी यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकातील महिला पोलीस अधिकाऱ्याला त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.