नवी दिल्ली – भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही आग लागली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
भंडाऱ्यातील या घटनेवर राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच मृत बाळांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करा असं आवाहन सरकारला केलं आहे. “महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामधील घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांचं मी सांत्वन करतो. मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो की, या घटनेतील मृत आणि जखमी बालकांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करावी” असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत