मुंबई : सचिन वाझे प्रकरणी परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर, अनिल देशमुखांनी मुंबईतील बार व रेस्टॉरंटकडून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेला दिल्याचा धक्कादायक आरोप परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला होता.
यांनतर, हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर, ऍड.जयश्री पाटील यांनी या भ्रष्टाचाराप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने निर्णय देताना, अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. यानंतर देशमुख यांनी ५ एप्रिल रोजी पदाचा राजीनामा दिला. तसेच, या प्रकरणी अनिल देशमुख यांची सीबीआयने चौकशी केली आणि त्यांच्या घरी झाडाझडतीही घेतली. त्याचबरोबर सीबीआयने काही पोलिसांचीही चौकशी केली.
दरम्यान, या प्रकरणी सीबीआयने भ्रष्टाचारासंदर्भात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. तसेच सीबीआयला कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी या याचिकेत केली असून,न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर या आठवड्यातच सुनावणी होण्याची शक्यता आहे.