पुणे : केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि माजी आमदार आणि हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. किरकोळ अपघाताच्या वादातून दुचाकीस्वाराला जाधव यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. हर्षवर्धन जाधव व इषा झा यांच्याविरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील औंध परिसरात एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात आरोप करण्यात आला आहे. अमन अजय चड्डा (वय-28, रा. आयटी पार्क समोर, बापोडी, पुणे) यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून त्यांना अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार चड्डा यांचे आई आणि वडील हे सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून औंध येथून ब्रेमन चौकाकडे जाणार्या रस्त्यावरून संघवी नगरकडे जात होते. त्यावेळी हर्षवर्धन यांनी चारचाकीचा दरवाजा अचानकपणे उघडला. त्यामुळे अपघात झाला. त्याबाबत चड्डा यांच्या वडिलांनी हर्षवर्धन जाधव यांना जाब विचारला. चड्डा यांच्या वडिलांनी त्यांचे हार्टचे ऑपरेशन झाले आहे हे देखील जाधव यांना सांगितले. त्यानंतर देखील आरोपींनी संगनमत करून चड्डा यांच्या आई आणि वडिलांच्या छातीवर आणि पोटावर लाथा मारल्या.
वडिलांच्या पोटामध्ये आणि छातीवर लाथाबुक्क्या मारल्या. आईलाही ढकलून दिलं. आईच्या पायावर लाथ मारुन तिला ढकलून दिले. यामुळे तिच्या पायालाही गंभीर दुखापत केली. त्यामुळे त्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.