मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या आजारावरील अनेक लसी शेवटच्या टप्प्यात असून, नवीन वर्षात नागरिकांसाठी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची लस आल्यानंतर ती सुरुवातीला डॉक्टर, पोलिस आणि कोरोना सेवकांना दिली जाणार असल्याची माहिती दिली होती.
कोरोनाची लस आल्यावर ती डॉक्टर, पोलीस व इतर आरोग्य सेवकांना प्रथम देण्यात येणार असे काल आरोग्य मंत्री बोलले, परंतु या बरोबरच सर्व सैनिक , माजी सैनिक व त्यांच्या परिवारा ला अग्रक्रमाने लसीकरण करण्यात यावे कारण हे सर्वच देशासाठी बलिदान देण्यात अग्रेसर असतात.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) December 2, 2020
यानंतर आता डॉक्टर, पोलिसांसह लष्करातील जवान आणि माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबाला देखील सर्वात प्रथम लस द्यावी अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
लष्करी जवान, माजी सैनिक आणि त्यांच्या परिवाराचाही प्रथम श्रेणीत समावेश करुन, त्यांनाही कोरोनाची लस दिली जावी. हे सर्वच देशासाठी बलिदान देण्यात अग्रेसर असतात असे नांदगावकर म्हणाले.
दरम्यान, लस आल्यानंतर ती पहिल्यांदा डॉक्टर आणि पोलिस कर्मचाऱ्यांनाच देण्यात येईल, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.