पाटणा : अभिनेता सुशांतसिंह राजपूर आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्राची बदनामी करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचे तिकीट अखेर कापण्यात आले आहे. बक्सरमधून निवडणूक लढवण्यासाठी गुप्तेश्वर पांडे उत्सुक होते. त्यासाठी त्यांनी जेडीयूमध्ये प्रवेशही केला होता. मात्र, जेडीयूने सर्व 121 उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात गुप्तेश्वर पांडे यांचे नाव नाही.
बिहार निवडणुकीच्या तोंडावर गुप्तेश्वर पांडे यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. बिहारचे पोलिस महासंचालक म्हणून व्हीआरसी घेतल्यावर राजकारणात प्रवेश करण्याच्या अटकळी गुप्तेश्वर पांडे यांनी वारंवार फेटाळून लावल्या होत्या. विधानसभा निवडणूक लढवण्याचं त्यांचं स्वप्न आता भंगले आहे. यानंतर निराश झालेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.
आपल्या अनेक हितचिंतकांच्या आवाहनामुळे मी अस्वस्थ झालो आहे. त्यांच्या चिंता आणि समस्या मलाही समजल्या आहेत. निवृत्तीनंतर प्रत्येकाची अपेक्षा होती की मी निवडणूक लढवावी. पण यावेळी मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. निराश होण्याचं काहीच नाही. धीर धरा. आपलं आयुष्य संघर्षातच गेलं आहे. मी आयुष्यभर सार्वजनिक सेवेत राहीन. कृपया धीर धरा आणि मला फोन करू नका. आयुष्य बिहारच्या जनतेसाठी मी जीवन वाहिलं आहे, असं गुप्तेश्वर पांडे म्हणाले.