जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आज राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची भेट घेत आहेत. एकनाथ खडसे हे रावेर येथील शासकीय विश्रामगृहावर आहेत. काहीवेळापूर्वीच अनिल देशमुख खडसे यांची भेट घेण्यासाठी विश्रामगृहाच्या दिशेने रवाना झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर सध्या शासकीय विश्रामगृहाबाहेर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. त्यामुळे आता देशमुख आणि खडसे भेटीत काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ खडसे आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, तुर्तास खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा हा मुहूर्त चुकला आहे. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर पाठवणार ते खडसे यांना महाविकासआघाडी सरकारमध्ये कृषिमंत्रीपद मिळणार, अशा चर्चा रंगल्या होत्या.
मात्र, तुर्तात खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावर काहीही भाष्य न करायचे ठरवल्याने या सर्व चर्चा फोल ठरल्या आहेत. परंतु, दुसरीकडे खडसे यांनीच ‘योग्य वेळ येईल , वाट बघा, असे सांगून राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला अजूनही वाव ठेवला आहे.
शासकीय विश्रामगृहातून हे दोन्ही नेते रावेर हत्याप्रकरणातील पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी घडलेल्या रावेर हत्याप्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख जातीने रावेरमध्ये आले आहेत.
माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाचे सारे मुहूर्त तुमचेच : एकनाथ खडसे
पत्रकारांनी खडसेंना त्यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, “या विषयाबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही”. मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत, ते सारे मुहूर्त तुम्हीच म्हणजेच माध्यमांनी ठरवले आहेत, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाचे खंडन केले.
एकनाथ खडसे 17 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी शनिवारी दुपारी जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला काहीच बोलायचे नाही, नो कमेंट्स” असे उत्तर देत या विषयाचे खंडन केले. “माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत”, असे खडसे म्हणाले.
Read Also :
मुख्यमंत्र्यांनी ओल्या दुष्काळाची पाहणी करावी, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल- प्रकाश आंबेडकर https://t.co/dX7ET3YjrV @Prksh_Ambedkar @OfficeofUT @CMOMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 17, 2020