पुणे : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅप अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. सातारा तालुका पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करत बदनामीचा कट उधळून लावला.
शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि. पुणे), राहुल किसन कांडगे (रा. चाकण, जि.पुणे), सोमनाथ दिलीप शेडगे (रा.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आमदारांचे पुतणे मयूर साहेबराव मोहिते-पाटील यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शैलेश मोहिते पाटील हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा सरचिटणीस आहे.
हनी ट्रॅप रचण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा संबंधित तरुणी ही साताऱ्यातील आहे, माझं ते कार्यक्षेत्र ही नाही. त्यामुळे ती माझ्या ओळखीची असण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. मला माझा पुतण्या आणि फिर्यादी मयूर मोहीतेने सांगितलं तेव्हा या मुलीचं नाव समजलं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी शैलेश मोहिते पाटील हा आमच्याच गावातला आहे. पण त्याचा आणि आमचा काहीच संबंध नाही, अशी प्रतिक्रिया एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली.
नोकरीच्या बहाण्याने आमदारांकडे जाऊन त्यांच्याशी संपर्क वाढवायचा आणि त्यानंतर त्यांना बदनाम करायचं यासाठी त्या मुलीला 90 हजार रुपये देण्यात आले होते. हा सर्व प्रकार चुकीचा वाटल्याने त्या मुलीने थेट आमदारांचे पुतणे आणि तक्रारदार असणाऱ्या मयूर मोहिते यांना फोन करुन सर्व प्रकार सांगितल्यानंतर हे षडयंत्र उघडकीस आले.