मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष होतील, अशा चर्चा मागील काही दिवसात सुरू होत्या. मात्र शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचे म्हणत राष्ट्रवादीकडून या चर्चांना पुर्णविराम देण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर ‘शरद पवारांनी यूपीएचे नेतृत्व करायला हवं’, अशी इच्छा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते अबू आझमी यांनी व्यक्त केली आहे.
शरद पवारांनी यूपीएचे नेतृत्व करावं अशी चर्चा आहे की नाही याबाबत मला माहिती नाही. पण मी या मताचा आहे की, आजच्या तारखेला काँग्रेसची देशात जी परिस्थिती आहे ते पाहता शरद पवारांनी यूपीएचे नेतृत्व करायला हवं. माझी अशी मनापासून इच्छा आहे, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसकडून देखील या चर्चा फेटाळण्यात आल्या आहेत. ‘यूपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत येणं हे राहुल गांधी यांच्या विरोधातील षडयंत्र आहे,’ असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी केला आहे.