नाशिक : राज्यातील राजकारण मराठा आरक्षणा भोवती फिरतांना दिसत आहे. आरक्षणावरु एकमेंकावर टिकेची झोड उठवत आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय. दुसरीकडे भाजप नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत मराठा संघटनांच्या पाठिशी आपली ताकद उभी केली आहे. संभाजीराजे छत्रपती आणि विनायक मेटे यांनाही एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती विखे-पाटील यांनी आज लोणी इथं माध्यमांशी बोलताना दिली.
मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी आपण बैठका घेत असल्याचं विखे-पाटील यांनी सांगितलं. या बैठकांमध्ये मराठा आंदोलनाच्या भविष्यातील रणनितीबाबत चर्चा करण्यात येत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सगळ्या संघटनांच्या नेत्यांनी एकत्र यावं असं आवाहन आपण करत असल्याचं विखे-पाटील म्हणाले. खासदार संभाजीराजे आणि विनायक मेटे यांनाही एकत्र आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात २३ संघटना काम करत आहेत, मग भूमिका वेगळी का? असा सवालही विखे-पाटील यांनी उपस्थित केलाय.
राज्य सरकार समाजात फूट पाडून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे. आपण आज किंवा उद्या संभाजीराजे यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपली भूमिका ही समन्वयाची आहे. संभाजीराजे यांना आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती आपण करु. सगळे एकत्र येऊन आठवड्याभरात बैठक घेऊ. कोणत्याही आंदोलनाचं नेतृत्व सामुदायिक असावं, असं विखे पाटील यावेळी म्हणाले. संभाजीराजे यांनी राज्यातील संघटनांच्या बैठकीला यावं, अशी विनंती आपण त्यांना करणार आहोत. समाजाचा दबाव वाढला की नेते मंडळी पुढे येतील, असा दावाही विखेंनी यावेळी केलाय.