परळी: ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक झाला असून राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु असून बीड, औरंगाबाद, नवी मुंबई, सोलापूर आणि इतर ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ओबीसी आरक्षणासाठी आज राज्यभर चालू असलेल्या चक्काजाम आंदोलनामध्ये परळीतल्या आंदोलनाचं नेतृत्व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केलाय. परळी शहरातील इटके कॉर्नर चौका मध्ये हे चक्काजाम आंदोलन चालू आहे, या आंदोलनानंतर सरकारचे डोळे उघडले नाही तर आम्हाला पुन्हा सरकारचे डोळे उघडण्यासाठी वारंवार आंदोलनं करावी लागतील असं खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या.
ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार; आशिष शेलारांचा इशारा
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप नेते आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. ओबीसींचे पूर्वीचे आरक्षण परत दिलं नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
ओबीसी आरक्षणावर लोणावळ्यात सर्वपक्षीय दोन दिवसीय शिबीर सुरु
ओबीसी आरक्षणावर पुढील रणनीती ठरवण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आजपासून लोणावळा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेल आहे. दोन दिवसांच्या शिबिरामध्ये अनेक विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या शिबिरात राज्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि इतर ओबीसी संघटनांमधील सर्व ओबीसी नेते सहभागी होणार आहेत