कराड: महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडी सरकारची सत्ता आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तीन पक्षांचं मिळून एकत्रितपणे सरकार सुरु आहे. राज्यात भाऊ भाऊ असणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील कराड सोसायटी मतदार संघात एकमेकांविरोधात उभे आहेत.
विशेष म्हणजे या संघर्षात भारतीय जनता पक्ष ज्याच्या बाजूने आपलं मत टाकेल त्याच पारडं जड होणार आहे. त्यामुळे राज्याचे सहकार मंत्री आणि माजी सहकार मंत्र्यांचा गट यांच्या संघर्षात भाजपच्या भूमिकेला महत्व आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सध्या सुरु आहे. या निवडणुकीत सगळ्यांचे लक्ष आहे ते सहकार मंत्री बाळासाहेब पाटील उमेदवार असलेल्या कराड सोसायटी मतदारसंघाकडे. या मतदारसंघात नेहमी माजी सहकार मंत्री विलासराव काका पाटील उंडाळकर याचे वर्चस्व होते.
मागील काही महिन्यांमध्ये त्यांचं निधन झालं आहे. आता त्यांचे पुत्र काँग्रेस नेते ॲड.उदयसिंह पाटील उमेदवार आहेत. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार हे स्पष्ट आहे. एका- एका मतांसाठी दोन्ही उमेदवार धडपडत आहेत आणि मेहनत घेत आहेत. या मतदारसंघात भाजपचे नेते आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर ज्याचे वर्चस्व आहे त्या डॉ. अतुल बाबा भोसले यांचीही ताकद आहे. त्यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवल्याने राजकीय गुंतागुंत कमालीची वाढली आहे. मतदारसंघात डॉ. अतुल भोसले यांच्या भूमिकेला महत्व आहे.
अतुल भोसले ज्या बाजूला कौल देतील त्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच या मतदारसंघातील भवितव्य भाजपाच्या हातात आहे. भाजप काय भूमिका घेणार सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपनेही ही चुरस पाहून आपले मतदार सहलीवर पाठवले आहेत.