मुंबई : मनसुख हिरेन आणि अँटिलीया स्फोटकं प्रकरणी मुख्य संशयित आरोपी सचिन वाझे याची सध्या एनआयए चौकशी सुरू आहे. आत्तापर्यंत या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले असून, आज कोर्टापुढे वाझेंनी सादर केलेल्या जबाबामधून आतापर्यंतच्या सर्वात धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत.
सचिन वाझे यांनी आज कोर्टापुढे हस्तलिखित पात्र सादर केलं असून, या पत्रामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी, वाझेंकडे २ कोटींची मागणी केल्याचं लिहिलेलं आहे. त्याबरोबर देशमुखांच्या नावासोबत वाझेंनी, शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचेही नाव जबाबात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
‘निलंबन टाळायचं असेल तर २ कोटी द्या’, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे केल्याचं वाझे यांनी म्हटलं आहे. तसेच, अनिल परब यांनीही आपल्याला खंडणी वसून करायला सांगितली असल्याचा, खळबळजनक आरोप वाझेंनी कोर्टापुढे सादर केलेल्या पत्रातून केला आहे.
सचिन वाझे यांनी हे ३ पानांचे पत्र शेअर केले आहे. दरम्यान, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा कोर्टाने ९ एप्रिलपर्यंत NIA कोठडी ठोठावली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी, मुख्यमंत्री कार्यालयाला एक पत्र पाठवून त्यात, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांच्यावर, सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुली करण्याचे आदेश दिल्याचे गंभीर आरोप केले होते.