परळी : परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील तरुण युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बिझनेस ऑन व्हील्स या उपक्रमाद्वारे तरुणाना उद्योगासाठी लागणारे वाहन घ्यायला अर्थसहाय्य देत आहोत. राज्य सरकार व गरज पडल्यास वैयक्तिक स्तरावर मदत उपलब्ध करून देऊन युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहित करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
परळी येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती उपक्रमांतर्गत बिझनेस ऑन व्हील्स उपक्रमाचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित नाव नोंदणी शिबिराचे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बेरोजगारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ‘माझा व्यवसाय माझा हक्क’ शिबिर घेण्यात येत आहे. कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे या दृष्टिकोनातून स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने परळी मतदारसंघासाठी या योजनेचा अधिकाधिक लाभ देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत विविध व्यवसायांसाठी वाहन,कर्ज उपलब्धी, सबसिडी, आवश्यक वाहने, साधनसामग्रीची व्यवस्था आदींबाबत सबसिडी बरोबरच कर्ज व आर्थिक हातभार लावण्यात येणार आहे. परळी मतदारसंघातील बेरोजगारांसाठी व स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी उपलब्धी ठरणार आहे.
या अतिशय महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर दि.११ते२५ या कालावधीत असणार आहे. सर्वसामान्यांसाठी या योजनेची लाभ वयोमर्यादा वय वर्षे १८ ते ४५ असून अनुसूचित जातीतील व्यक्तींसाठी ती वय वर्षे १८ ते ५० इतकी आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार व धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त १५ जुलै ते २२ जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या सेवा सप्ताह या उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.