गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर आला आहे. बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच कोकणातील गणेशोत्सवाकरिता मुख्यमंत्र्यांनी विशेष निर्देश दिले आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील वैद्यकीय सुविधा वाढविण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिल्या. सुरक्षित गणेशोत्सवासाठी कोकणातील गावोगावच्या दक्षता समित्या, गणेश मंडळांनी अधिक सतर्क राहावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडून कोरोनाच्या) उपाययोजनांचा आढावा घेतला. कोरोनाचा संसर्ग मुंबईजवळच्या रायगड जिल्ह्यात वाढत आहे. त्या तुलनेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे त्याचा प्रादुर्भाव नसला तरी गणेशोत्सव काळात नागरिकांची होणारी ये-जा पाहता प्रशासनाने पुरेपूर काळजी घ्यावी आणि दक्ष राहावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या आढावा बैठकीत दिल्या.