मुंबई : ऑनलाईन शॉपिंग अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याबाबत मनसेनं आक्रमक भूमिका घेतली होती. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा मनसेने दिला. त्यानंतर अॅमेझॉन अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात आला आहे. आता मनसेने डिज्नी हॉटस्टारला देखील असाच इशारा दिला आहे.
मनसेचे कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी यासंदर्भात डिज्नी हॉटस्टार कंपनीला पत्र पाठवत, आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांची कॉमेंट्री मराठीत करण्याची मागणी केली आहे.
आय.पी.एल.क्रिकेट सामान्यांची कॉमेंट्री मराठीत करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही आवश्यक ते सहकार्य करू,पण नुसतीच चालढकल केलीत तर महाराष्ट्र सैनिकांशी गाठ आहे हे लक्षात असुद्या..@DisneyPlusHS @IPL pic.twitter.com/edXTO2TONY
— Ketan Naik (@ketannaik4) October 20, 2020
केतन यांनी ट्विट केले की, आय.पी.एल.क्रिकेट सामान्यांची कॉमेंट्री मराठीत करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही आवश्यक ते सहकार्य करू,पण नुसतीच चालढकल केलीत तर महाराष्ट्र सैनिकांशी गाठ आहे हे लक्षात असु द्या.
आयपीएलचा यंदाचा हंगाम संपण्याआधी कंपनीने मराठी भाषेमध्ये समालोचन ऐकण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी विनंती या पत्रामध्ये मनसेने केली आहे. तसेच पत्राच्या शेवटी कंपनीने वेळेत यासंदर्भात निर्णय घेतला नाही तर ‘मनसेच्या प्रचलित पद्धतीने आंदोलन करावे लागेल व त्यामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी, असे मनसेने आपल्या पत्रात म्हटले आहे.