नाशिक : एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना दुसरीकडे नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजनच्या टाकीला दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली आणि या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत ११ पुरुष आणि ११ महिला अशा मिळून २२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत देशभरातून संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर, माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, शोक व्यक्त केला आहे. तसेच ही घटना धक्कादायक असल्याचं म्हणत, या घटनेच्या सखोल चौकशीचीही मागणी त्यांनी केली आहे.
‘नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली घटना प्रचंड धक्का देणारी आणि ह्रदयद्रावक आहे. ऑक्सिजन टाकीला गळती लागून आत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही आठवी घटना आहे. कुठं शॉर्ट सर्कीट होतं, कुठं लहान मुलांच्या हॉस्पीटलमध्ये मुलं दगावतात. तातडीने या घटनेची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असं म्हणत, रुग्णालयातील इतर रुग्णांच्या शिफ्टींगचं काम सुरक्षितपणे व्हायला हवं. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना भरीव मदत मिळाली पाहिजे,’ अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
आज सकाळच्या सुमारास डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या मोठ्या ऑक्सिजन टाकीचा कॉक नादुरुस्त असल्याने, त्यातून गळती सुरू झाली. ही गळती रोखण्यासाठी जेव्हा तंत्रज्ञ कारागीर दाखल झाले आणि दुरुस्तीचे काम सुरू झाले, त्याचवेळेस नादुरुस्त कॉक पूर्णपणे तुटला. त्यांनतर ऑक्सिजन टाकीतून मोठ्या प्रमाणात वायू गळती होऊन ही दुर्दैवी घटना घडली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. “ऑक्सिजन टँक लीक झाल्यामुळे नाशिकमधील रुग्णालयात घडलेली घटना ही हृदय पिळवटून टाकणारी आहे. यात जीवितहानी झाल्यानं मन हेलावलं आहे. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबीयांचं सांत्वन,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.