IMPIMP

“मी भक्त म्हणून खूप कमी पडलो”, मोदींसाठी प्रवीण अलई यांची भावनिक पोस्ट

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कल हाती येत आहे. यामध्ये भाजपला पुर्ण बहुमत अद्यापही मिळालेला नाहीय. तर एनडीए आघाडीला आतापर्यंत २९१ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर काही ठिकाणी उमेदवार विजयी झाले आहेत. यातच आता विरोधात असलेल्या इंडिया आघाडीने देखील सत्ता स्थापनेचा दावा ठोकला आहे. त्यामुळे सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. अशातच आता भाजपचे युवा नेते प्रवीण अलई यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे.

प्रवीण अलई यांनी आपल्या पोस्ट मध्ये असं म्हटलंय की , खूप दुःख होत आहे. अनेक गुणांनी युक्त असलेला आणि समस्त हिंदूंना, भारताला, त्याची ओळख जगात मिळवून देणारा, पंतप्रधान या क्षणी बहुमत मिळेल की नाही या वावटळीत आहे.

विकास आणि विकास. दिवसाचे किमान १८ तास काम आणि काम. प्रचंड परिश्रम. सर्व स्तरातील समाजासाठी ठरवून उत्तम काम. त्याची दिसणारी फळे. जाणवणारा प्रचंड काया पालट. आंतरराष्ट्रीय संबंधांचे नवे विजिगीशू पर्व.

या सर्वापेक्षा प्रत्येक क्षणी सोबत असणारा पितृतुल्य पंतप्रधान. फसलेल्या आंतराळ मोहिमेवेळी आपल्या शास्त्रज्ञांचे सांत्वन करणारा. ऑलिंपिक मध्ये जिंकलेल्या खेळाडूंशी खाजगी हितगुज करणारा. आर्थिक नियोजनाचे भान असणारा. सर्व जगाला भारत गुरुस्थानी आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारा हा नेता, वाराणसी संपूर्ण बदलवतो, तेथे तो एखाद्या फेरीत का होईना, मागे कसा पडू शकतो ..?

नरेंद्रजी मोदी साहेब, तुम्ही आज संध्याकाळ पर्यंत भाजपला बहुमत मिळवून पुन्हा पंतप्रधान व्हाल सुद्धा. पण नक्की खंत राहील की, भारतात विकासाच्या आणि सर्वंगिण विकासाच्या जोरावर मते नाही मिळवता येत.आम्ही जात पाहणार. उपासना व पंथ पाहणार. धर्म पाहणार आणि मतदान करणार.

मी क्षमा मागतो तुमची मोदीजी. माझ्या सद भाग्याने मला तुमचा कार्यकाळ पाहता आला आहे व तुमची भेट घेता आली आहे. विदेशी सत्ताधिशाला भेट म्हणून भगवदगीता देणारा नेता, फक्त त्याच्या पक्षाच्या हिंमतीवर देशाला पंतप्रधान म्हणून लाभायला हवाय. आणि तुम्हाला मिळणारी सत्ता ही तुमच्या व्यक्तिगत हितासाठी नव्हती. हे समजून माझ्यासारख्या अनेकांनी या निवडणूक काळात कष्ट घ्यायला हवे होते. मी ते नाही घेतले. लाज वाटते आहे मला मोदीजी.

स्वतःला कशी क्षमा करायची ?
तुम्ही पंतप्रधान झाल्या नंतर मला व सहयोगी कार्यकर्त्याना एकदा एक मित्र भक्त म्हणाला होता. मला ते खटकले होते. त्यावेळी म्हणालो होतो, मी स्वयंसेवक आहे भक्त नाही कोणाचा.

आज मनापासून सांगतो आहे, मी तुमचा भक्त आहे. आणि माझी तुमच्यावरील भक्ती ही तुमच्या कामातून निर्माण झाली आहे.
देव भक्तासाठी नेहमीच करतो. पण हा देश जिवंत राहण्यासाठी एक देव सध्या जिवंत आहे.
मी भक्त म्हणून खूप कमी पडलो , हे नक्की मान्य करतो.