मुंबई – हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा शाब्दिक सामना पाहण्यास मिळाला. सभागृहात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली होती
राज्य सरकारने आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्या. यावर सुधीर मुनगंटीवार बोलायला उभे राहिले होते. यावेळी त्यांनी चौफेर टोलेबाजी करत राष्ट्रवादी आणि सेनेच्या नेत्यांना चिमटे काढले. भाषण वाढत असल्यामुळे मुनगंटीवार यांना मुद्यावर बोलण्याचे सांगितले असता, ‘आता आम्ही समर्थ आहोत. सभागृह हे माझे कुटुंब आहे. माझ्या भाषणात कुणी अडथळा आणत असेल किंवा अडकाठी आणत असेल तो पुन्हा निवडून येत नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.
त्यानंतर समोरच बसलेल अजित पवार म्हणाले की, ‘तुमचे आव्हान मी स्वीकारले आहे, मला पाडूनच दाखवा’ असा खुमासदार टोला लगावला. अजितदादांच्या टोल्यानंतर सभागृहात एकच हश्शा पिकली.
पण, अजितदादांच्या खुमासदार विधानावर सुधीर मुनगंटीवार यांनी गुगली टाकली. ‘मुळात पडण्याचे दोन प्रकार आहे. एक लोकशाहीमध्ये आणि दुसरा 23 नोव्हेंबरचा आहे. हे आम्ही करून दाखवले आहे, असं काय करता दादा, आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे’ असं मुनगंटीवार म्हणाले असता पुन्हा सभागृहात एकच हश्शा पिकली.