मुंबई : करोनाने राज्यात हाहाकार उडविलेला आहे. राज्यात परिस्थती हाताबाहेर गेली असून, काल तब्ब्ल करोना बाधित रुग्णांच्या आकड्यामध्ये ६७ हजार १२३ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे आणि एकाच दिवसात ४१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, रेमडेसिवीरचा पुरवठा करणाऱ्या ब्रूक्स फार्मा कंपनीच्या राजेश डोकानिया यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. दमण येथील या कंपनीने महाराष्ट्रासाठी भाजपला ५० हजार रेमडेसिवीर देण्याचे कबूल केले होते. या कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, पराग अळवणी आदी नेत्यांनी बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात मध्यरात्री धाव घेतली.
यावरून आता राज्यात राजकारण रंगू लागले आहे. सत्ताधारी पुरवठादारांवर दबाव टाकत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर, भाजप नेते पोलिसांवर दबाव टाकून साठेबाजांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रत्यारोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेत्यांना ट्विट करत एक सणसणीत टोला लगावला आहे. “ब्रूक्स फार्मा या कंपनीचे साठेबाजी करणे आणि औषधे काळ्या बाजारात विकणे त्यांचा धंदा जोरात आहे. गुजरात मध्येच त्यांच्यावर केस झाली आहे. महाराष्ट्राला आता सगळ्या राजकारण्यांनी एक व्हावं याची गरज आहे. हे लहान पोरांसारखं माझं चॉकलेट तू का काढून घेतलंस. रागाच्या भरात चूक झाली असेल…” असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ब्रूक्स फार्मा या कंपनीचे साठेबाजी करणे आणि औषधे काळ्या बाजारात विकणे त्यांचा धंदा जोरात आहे. गुजरात मध्येच त्यांच्यावर केस झाली आहे. महाराष्ट्राला आता सगळ्या राजकारण्यांनी एक व्हावं याची गरज आहे. हे लहान पोरांसारख माझ चॉकलेट तू का काढून घेतलंस.
रागाच्या भरात चूक झाली असेल… pic.twitter.com/2ccKfVf7yZ— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 18, 2021
एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अशाप्रकारचे राजकारण सुरु असताना, दुसरीकडे मात्र राज्यात बेड्स, ऑक्सिजन आणि रेमेडीसीवर इंजेक्शन्स शिवाय करोना रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, देशातील वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन मागवण्यात आला आहे. त्यासाठी विशेष ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार असून यामधून राज्यासाठी ऑक्सिजन आणला जाणार आहे.