मुंबई – शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता भाजप नेत्यांनी संजय राऊत याना वेठीस धरले आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी ईडीच्या नोटिशीवरुन शिवसेना खासदार यांच्यावर टीका केली आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी एचडीआयएलसोबत संजय राऊत यांचा संबंध काय?, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. तर, चोरी केली तर हिशोब द्यावाच लागेल, असं टीकास्त्र सोमय्यांनी राऊतांवर सोडलं आहे.
पीएमसी बँक पूनर्जिवीत करण्यासाठी इडीकडून ही कारवाई आहे. हे राजकारण नसून अर्थकारण आहे. “हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने पीएमसी बँकेत साडे पाच हजार कोटींचा घोटाळा झाला, पैसे वसूल करा”, असा आदेश दिला असल्याचं सोमय्या म्हणाले. “पीएमसी बँकेतील पैसे एचडीआयएलच्या खात्यातून प्रवीण राऊत, त्यांच्याकडून माधुरी राऊत आणि मग तिथून वर्षा संजय राऊत यांच्या खात्यात ट्रांसफर झाले”, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.
“शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर चिठ्ठी लिहीतात की पीएमसी बँकेत त्यांचे कोटी रुपये पैसे फसले तर दुसरीकडे संजय राऊत यांच्या खात्यात हे पैसे जातात”. चूक केलीये तर हिशोब तर द्यावाच लागेल, असा इशारा किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांना दिला.