मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडी आढळली होती. तपासात या गाडीचे मालक मनसुख हिरेन असल्याचे आढळले होते. मात्र नंतर त्यांचा मृतदेह खाडीत आढळून आला होता. या प्रकरणात सातत्याने आणखी एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे सचिन वाझे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस थेट सचिन वाझे यांचे नाव घेत त्यांच्यावर गंभीर आरोप करत आहे.
फडणवीस यांनी वाझेंवर गंभीर आरोप करत मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांची तक्रार देखील वाचून दाखवली. विमला हिरेन यांच्यानुसार वाझे यांनीच मनसुख हिरेन यांचा खून केला असल्याचे देखील फडणवीस म्हणाले. तसेच वाझेंना अटक करम्याची मागणी त्यांनी केली. सचिन वाझे नक्की कोण आहेत, ते जाणून घेऊया.
कोण आहेत सचिन वाझे?
पोलीस अधिकारी असलेले सचिन वाझे 90च्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट’ म्हणून ओळखले जातात. सचिन वाझे 1990 मध्ये मुंबई पोलिसात सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाले. त्यांच्या नावावर 60 पेक्षा अधिक एन्काऊंटर आहेत.
रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना घरातून अटक केल्यामुळे वाझे चर्चेत आले होते. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या ‘क्राइम इंटेलिजन्स युनिट’ चे प्रमुख आहेत. वाझे यांनी छोटा राजन आणि दाऊद इब्राहिमच्या अनेक गुंडांचा एन्काऊंटर केला आहे. त्यांनी एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत देखील काम केले आहे.
एका प्रकरणात 2004 मध्ये सचिन वाझेंना पोलीस दलातून निलंबित केले होते. यानंतर 4 वर्षांनी 2008 मध्ये त्यांनी दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश देखील केला होता.
जून 2020 मध्ये मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सचिन वाझेंचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 6 जून, 2020 रोजी पुन्हा पोलिस दलात परतले आहेत. मात्र परतल्यानंतर आता ते मनसुख हिरेन प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आहेत.
सचिन वाझे यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्यावर ‘जिंकून हरलेली लढाई’ नावाचे पुस्तक मराठीत लिहिले होते. शीना बोरा हत्या प्रकरण आणि डेविड हेडली यांच्यावरही त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत.
फडणवीसांनी अंबानींच्या घराबाहेर संशयास्पद गाडी मिळाल्यानंतर सर्वात पहिले सचिन वाझे पोहोचल्याचा दावा केला आहे. तसेच, हिरेन यांच्या पत्नी विमला यांची तक्रार वाचून दाखवताना देखील त्यांनी अनेक आरोप केले आहेत. मात्र, गाडीजवळ आपण पहिल्यांदा पोहचलो असल्याचा दावा वाझे यांनी फेटाळून लावला आहे.