कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा आखाडा तापण्यास सुरुवात झाली आहे. कारण भाजपने कोल्हापूर मनपासाठी टीम जाहीर केली आहे. माजी खासदार धनंजय महाडिक आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्त्वात भाजप कोल्हापूर मनपाची निवडणूक लढणार आहे. त्यामुळे साहजिकच कोल्हापुरात पुन्हा एकदा काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक असा सामना होणार आहे.
भाजपने पालिका निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या कमिटीत माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह सतेज पाटील यांच्या कट्टर विरोधकांना घेत मोट बांधली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा सतेज पाटलांविरोधात महाडिकांना रिंगणात उतरवले आहे.
त्यामुळे या निवडणुकीत आता चांगलाच रंग येणार आहे. महापालिकेची ही निवडणूक सतेज पाटलांसाठी विधानपरिषदेच्यादृष्टीने महत्वपूर्ण ठरणारी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जास्त जागा आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर दुसऱ्या बाजूला सतेज पाटील यांना याच निवडणुकीत मागे टाकून त्यांची विधानपरिषदेला कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची टीम
विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत पराभव झाल्याने सतेज पाटील यांनी अमल महाडिक यांचे वडील महादेवराव महाडिक यांचा विधानपरिषदेत पराभव करत आमदारकी मिळवली होती. तर आमचं ठरलंय म्हणत शिवसेनेच्या उमेदवाराला पाठबळ देत लोकसभेला धनंजय महाडिक यांना परभावाची धूळ चारली. याशिवाय 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुतण्या ऋतुराज पाटील यांना अमल महाडीक यांच्या विरोधात मैदानात उतरवत, त्यांचाही पराभव केला.
त्यामुळे सतेज पाटील यांच्यावर चिडून असलेल्या महाडिक परिवारालाच भाजपने पुढे केले आहे. महाडिकांचा समाविष्ट असलेल्या या कमिटीवरच पहिली टीका सतेज पाटील यांनी करत आपला इरादा स्पष्ट केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाडिक- पाटील आमने सामने येणार असून यात कोण वरचढ ठरणार आता येणारी निवडणूकच दाखवून देणार आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणूक पक्षीय बलाबल
काँग्रेस- 30
राष्ट्रवादी- 15
शिवसेना- 04
ताराराणी आघाडी- 19
भाजप- 13
एकूण जागा – 81
Read Also :
‘नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं करा’, उद्धव ठाकरेंना ‘या’ आमदाराने सूचवलं नाव
प्रस्ताव ‘मंत्रालया’तून आला की ‘वर्षा’वरून? मुंबई महापालिकेत शिवसेना-काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी
औरंगाबाद नामांतरण : शिवसेना बाजूने, काँग्रेस विरोधात, आता राष्ट्रवादीची भूमिका जाहीर
‘भाजपाने नाक घासून महाराष्ट्राची माफी मागितली, तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही’
‘औरंगाबादचं नाही तर पुण्याचं नामकरण संभाजीनगर करावं’, प्रकाश आंबेडकरांची मागणी