मुंबई: राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे,अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान पार पडेल. तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. कोरोनाच्या सावटाखाली या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे.
पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ
विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदानासाठीचे सर्व कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहचले आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी विभागात 4 लाख 32 हजार, तर शिक्षक मतदारसंघासाठी 74 हजार 860 इतके मतदार आहेत. तर पुणे विभागात मिळून एकूण 1 हजार 202 मतदान केंद्र आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत.