मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता नेमलेल्या समितीने अहवाल आज राज्य शासनाला सादर केला असून, त्या अंतर्गत आता राज्यात स्वस्त किंमतीमध्ये मास्क उपलब्ध होणार आहे. याबाबतचा निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरले आहे.
एन-95 मास्क त्याच्या प्रकारानुसार, साधारण 19 ते 50 रुपयांपर्यंत उपलब्ध होई,ल तर दुहेरी आणि तिहेरी पदरांचे मास्क अवघ्या तीन ते चार रुपयांना मिळतील. समितीने निर्धारित केलेल्या किंमतीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शासन मान्यतेनंतर सुधारीत दरानुसार मास्क विक्री करणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मास्क आणि सॅनिटायझरला मोठी मागणी असून त्याचे दर नियंत्रित असावेत यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्यात आली होती. यासाठी 4 सदस्यीय समितीची देखील नियुक्ती करण्यात आली होती. या समितीने अभ्यास करून मास्कच्या किंमती कमी करण्यास सांगितली आहे.
मास्क किफायतशीर किमतीत उपलब्ध झाल्यावर सामान्यांना दिलासा मिळणार असून योग्य निकषानुसार त्याचे उत्पादन देखील होईल आणि योग्य दरात त्याचा पुरवठाही होईल. रुग्णालयांच्या रुग्णसेवा खर्च देखील त्यामुळे कमी होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.