लखनऊ : उत्तर प्रदेशमधील पीलीभीत मतदारसंघाचे खासदार आणि भाजप नेते वरुण गांधी यांचा एक कथिच ऑडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात एका व्यक्तीने रात्री 10 वाजता मदतीसाठी फोन केल्याने वरुण गांधी चांगलेच भडकले. मद्यतस्काराने रात्री उशीरा वरुण गांधी यांना फोन करुन मदत मागितली, मात्र यावेळी भाजप खासदार भडकले.
व्हायरल होणाऱ्या ऑडिओत एका बाजूने वरुण गांधी बोलत आहेत, तर दुसऱ्या बाजूने सर्वेश नावाचा व्यक्ती बोलत आहे. यावेळी रात्री उशीरा फोन केल्यानं खासदार वरुण गांधी संबंधित व्यक्तीवर संतापतात आणि मी तुझ्या बापाचा नोकर नाही, असे सुनावतात.
सर्वेशच्या घरावर रात्री पोलिसांनी छापा मारला होता. त्याच्या घरामध्ये अवैधरित्या दारुचा साठा मिळाला होता. तो घरातून दारू विकत होता. यानंतर पोलिसांनी कारवाई करत सर्वेशला ताब्यात घेतले. तसेच त्याला सुनगढीच्या आसमरोड पोलीस ठाण्यामध्ये घेऊन आले. इथे त्याने पोलिसांना खासदारांना फोन करणार असल्याचे सांगितले. यावेळीची ऑडिओ व्हायरल होत आहे.
मी तुझ्या बापाचा नोकर नाही, अशा शब्दात वरूण गांधींनी मदत मागणाऱ्याला सुनावल्याने त्यांच्यावर आता टीका होत आहे.