पश्चिम बंगाल – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. मुख्य लढत ही तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी पुढील महिन्यात भाजपच्या विरोधात मेळावा घेणार असल्याचे समजत आहे.
या मेळाव्यासाठी ममता बॅनर्जी यांनी भाजप विरोधी पक्षांशी संपर्क साधल्याचेही समजते. यासाठी ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरचर्चा केली.
पश्चिम बंगालमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकांची लढाई प्रामुख्याने तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात केंद्रीत आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि तृणमूल यांच्यातील संघर्ष आणखी वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी या भाजपविरोधी पक्षांवर लक्ष केंद्रीत करत आहेत. पुढील महिन्यात कोलकाता येथे एक रॅली काढली जाण्याची शक्यता आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टालिन यांनाही ममता बॅनर्जी यांनी संपर्क केल्याचे समजते. ममता बॅनर्जी यांच्या भाजप विरोधी मेळाव्यात या नेत्यांचाही सहभाग असण्याची शक्यता आहे.