कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी या आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींच्या पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. तृणमूल काँग्रेस 200 पेक्षा अधिक जागा मिळवत, एकहाती विजय मिळवला आहे.
ममता बॅनर्जी या आज सकाळी 10 वाजून 45 मिनीटांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजभवनात साधेपणाने हा शपथविधी पार पडेल. त्यानंतर 6 मे रोजी विधानसभेचे प्रोटेम अध्यक्ष बिमान बॅनर्जी हे सर्व पक्षाच्या आमदारांना शपथ देतील.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठराविक नेत्यांनाच या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, तृणमूलचे महासचिव पार्थ चटर्जी, ज्येष्ठ नेते सुब्रतो मुखर्जी, राज्याचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त डाव्या पक्षाचे नेते विमान बोस, बंगाल भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष, भाजप नेते मनोज टिग्गा, काँग्रेस नेते अब्दुल मन्नान, प्रदिप भट्टाचार्य, काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांना निमंत्रण देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, निवडणूक निकालानंतर बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटनासमोर आल्या आहेत. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज देशभरात धरणे आंदोलन करणार आहे, याबाबत भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घोषणा केली आहे.