केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच, गुरुवारी 7 जानेवारीला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची मुंबईत भेट घेत ऋणानुबंध कायम असल्याचं दाखवलं. या भेटीने मनोहर जोशी भारावले. या भेटीबाबत जोशी सर भरभरुन बोलले. “नितीन गडकरी घरी आल्याचा आनंद झाला. गडकरींनी स्वतःहून भेटीसाठी येत असल्याचं सांगितलं. त्यांच्याबाबत मला संपूर्ण माहिती आहे. ते स्पष्टवक्ते आहेत”, असं मनोहर जोशी म्हणाले.
मनोहर जोशी म्हणाले, “गडकरींनी स्वतःहून सांगितलं मी भेटण्यासाठी येतोय. मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो. मी घरी गेलो. नितीन गडकरींची मला माहिती पूर्ण आहे. त्यांनी माझ्या नातवाशी चर्चा केली. गडकरी घरी आल्याचा आनंद झाला. त्यांचे मुख्य वैशिष्टय आहे स्पष्टवक्तेपणा. यामुळे राजकारणात अनेकदा नुकसानही होते. पण त्याची पर्वा न करता गडकरी त्यांच्या मनात जे आहे ते बोलतात. ते बराच वेळ माझ्या घरी बसले होते. आमच्या चांगल्या गप्पा झाल्या. मग ते गेले. ती राजकीय भेट नव्हती. सामाजिक भेट म्हणाल तर जरूर होती”.
नितीन गडकरींनी बांधलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून गेल्यानंतर आज सर्वजणच धन्यवाद देतात, असंही मनोहर जोशींनी सांगितलं.
बरेच दिवस आम्ही भेटलो नव्हतो. त्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि आम्ही भेटलो. आताच्या मंत्रिमंडळातील माझे सर्वात आवडते मंत्री आहेत, असं जोशी म्हणाले.
माझ्या मुलाची नितीन गडकरींशी चांगली मैत्री आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये जास्त गप्पा झाल्या. फार गंभीर चर्चा झाली नाही. पण काही प्रश्न बोलण्याच्या ओघात येतात. माझ्या नातवाशी गडकरींनी गप्पा मारल्या. थोडी चर्चा झाली पण चांगली चर्चा झाली, असं त्यांनी नमूद केलं.