पुणे: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल पाठवल्या प्रकरणी आरोपी शैलेश शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस पुढील कारवाई करत आहेत. मुलांचे शैक्षणिक वर्ष हॅचिंग शाळेने वाया घालवले, आम्हाला न्याय मिळत नाही, असा दावा आरोपी शैलेश शिंदेंसोबतचे पालक संतोष पोलकमवार यांनी केला आहे.
सोमवारी संध्याकाळी शैलेशनं हा मेल केला होता. मुलीचं शाळेत अॅडमिशन न झाल्यानं त्यानं गृह विभागाला धमकीचा मेल केला असल्याचं समोर आलं आहे. सोमवारी संध्याकाळी हा मेल आल्यानंतर डॉगस्कॉडद्वारे मंत्रालयात शोध घेण्यात आला, मात्र याठिकाणी कोणतीही स्फोटक वस्तू आढळून आलेली नाही. मात्र, खबरदारी म्हणून या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. सध्या शैलेश मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. मंत्रालय बॉम्बनं उडवण्याची धमकी दिल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला अटक केली होती. यानंतर त्याच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलिसांत गुन्हा दाखल करत त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. शैलेशनं मुलीचं शाळेत अॅडमिशन न झाल्यानं हा मेल पाठवला असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
पालकांचं म्हणणं काय?
“आम्हाला न्याय नाही मिळाला, म्हणून हा पेपर बाँम्ब आहे. निदान आता तरी सरकार आम्हाला न्याय देईल किंवा देईल की नाही माहिती नाही. आम्ही शिक्षण विभाग, मुख्यमंत्री कार्यालय आणि सर्व प्रशासकीय यंत्रणांना पत्र पाठवली, ईमेल केले, मात्र तरीही आम्हाला न्याय मिळत नाही. मुलांना नापास करण्यात आलं. आमच्या मुलांना शिक्षणापासून हॅचिंग शाळेने वंचित ठेवलं” असा आरोप संतोष पोलकमवार यांनी केला आहे.