मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात सरकारविरोधात वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली होती. यातच खासदार अमोल कोल्हे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्वाचे विधान करत जर वेळ पडली तर ओबीसी समाजाने मन मोठे करुन मराठा समाजातील वंचितांना सामावून घ्यावे, असे विधान केले होते.
या मागणीला ओबीसी संघटनांकडून विरोध होत आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच मतभेद पाहण्यास मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सरचिटणीस बबन मदने यांनी खासदार अमोल कोल्हेंच्या विधानाला विरोध केला आहे.
बबन मदने म्हणाले की, ओबीसी समाजाने मोठे मन दाखवावे म्हणजे काय करायचे? आपल्या भूमिकेमुळे मराठा आणि ओबीसी समाजात गैरसमज पसरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मराठा समाजाला जे आरक्षण हवं असेल ते त्यांनी वेगळे मागावे, मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात टाकल्यास याचा नक्कीच विरोध करणार आहोत, असेही ते म्हणाले.
मराठा समाजाने ओबीसीमध्ये आरक्षण मागू नये अशी ठाम भूमिका मदने यांनी मांडली.