मुंबई – सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी 25 जानेवारी तारीख देण्यात आली होती. मात्र, आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी 5 फेब्रुवारीला पाच न्यायमूर्तींच्या बेंचसमोर सुनावणी होणार आहे. राज्यातील मराठा संघटना आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेत विनायक मेटे यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला आहे. तर, मराठा ठोक क्रांती मोर्चानं EWS च्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
राज्य सरकारनं मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून 12 टक्के आरक्षण दिलं होते. सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती. न्या. अशोक भूषण, न्या. नागेश्वर राव, न्या. अब्दुल नजीर, न्या. हेमंत गुप्ता, न्या. रवींद्र भट यांच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाची याचिका आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणप्रकरणी सुनावणीची तारीख 25 जानेवारी देण्यात आली होती. मात्र, आता 5 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
राज्य सरकारने न्यायालयाला प्रत्यक्ष सुनावणीची मागणी केली. येत्या 5 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होईल. पण, ही प्रत्यक्ष सुनावणी होईल की नाही ते निश्चित होईल. या सुनावणीत मराठा आरक्षणाला न्याय मिळेल. व्हिडीओवर सुनावणी घेणं अवघड आहे, हे मराठा आरक्षण समर्थकांचं म्हणणं होतं. आज न्यायालयात विशेष काहीच घडलेलं नाही, पुढील सुनावणी 5फेब्रुवारीला होईल, मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले.