अहमदनगर: भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्या मुलीचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. राम शिंदे यांना डॉक्टर लेकीसाठी कलेक्टर जावई मिळाला आहे. या लग्नाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रोहित पवार यांची यावेळी आमनेसामने भेट झाली. दोघांनी हसतमुखाने एकमेकांना नमस्कार केला.
म शिंदे यांची कन्या डॉ. अक्षता शिंदे यांच्या लग्न समारंभाला देवेंद्र फडणवीसांसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, रासप अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते मंडळींनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. डॉ. अक्षता शिंदे आणि आएएस श्रीकांत खांडेकर यांचा साखरपुडा व्हॅलेंटाईन डेला झाला होता.
कोण आहेत राम शिंदेंचे जावई?
श्रीकांत खांडेकर यांनी बी. टेकचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. शासकीय सेवेत रुजू होण्याची जिद्द मनात असल्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यामातून ते आएएस झाले. त्यानंतर या घवघवीत यशाबद्दल सत्कार करण्यासाठी ग्रामस्थांनी तयारी सुरु केली. श्रीकांत यांचा सत्कार माजी मत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्याचे ठरले. यावेळी राम शिंदे यांना आपली मुलगी डॉ. अक्षतासाठी योग्य वर म्हणून श्रीकांत खांडेकर मनात भरले. त्यानंतर हे नातं जुळून आलं.
रोहित पवार आणि राम शिंदेंचा स्नेह
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. टीका टिपण्णी आणि आरोप प्रत्यारोपांनी गाजलेली कर्जत जामखेडची निवडणूक गाजली होती. रोहित पवार यांनी निवडणुकीतील सर्व मतभेद बाजूला ठेवून, विजयानंतर राजकीय सभ्यतेचं दर्शन घडवलं होतं. रोहित पवार यांनी विजय मिळवल्यानंतर राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. इतकंच नाही तर राम शिंदे यांच्या मातोश्रींच्या पाया पडून त्यांचेही आशीर्वाद रोहित पवार यांनी घेतले होते.