मुंबई : ‘महाविकास आघाडी सरकारचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वांना अशक्य वाटणारी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि ताबडतोब त्याची अंबलबजावणीही केली. त्यानंतर आलेल्या चक्रीवादळातही सरकारने मदत जाहीर केलं. कोरोना काळात घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे कटुता आली, पण लोकांच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ते निर्णय घेतले’; असं एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकाने केलेल्या कामांसंदर्भात बोलताना सांगितलं. ते एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमात बोलत होते.
‘कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्याची आर्थिक घडीही विस्कटली आहे. एकंदरीत संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे. पण आपल्या राज्यात ही घडी सावरण्यात आपल्याला यश मिळत आहे. कोरोना काळातही अनेक उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक केली आहे.’, असंही त्यांनी सांगितलं.
कांजूर कारशेडची जागा ही राज्य सरकारचीच : एकनाथ शिंदे
‘मेट्रो कारशेड आरेमध्ये होत होतं, पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनानंतर ते कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतला. विभागिय आयुक्त, कलेक्टर, तत्कालीन महसूल मंत्री यांनी सॉलपॅन कमिशनच्या विरोधात त्यांचं अपील फेटाळून लावलं. त्यावेळी मदान समिती जी होती, त्यांनीदेखील त्यावेळी सांगितलं होतं की, कांजूरमार्ग ही कारशेडसाठी उत्तम जागा आहे. असं असून देखील मेट्रो कारशेड आरेमध्ये हलवण्याचा निर्णय का घेण्यात आला? त्यामुळे एकदा झालेली चूक तशीच ठेवायची की, ती दुरुस्त करायची, हाच विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार ताकदीनं लढतंय : एकनाथ शिंदे
‘मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. यासंदर्भात माझी सर्वांना विनंती आहे की, कोणीही राजकारण करु नका. पूर्वीच्या सरकारमध्ये आम्हीही होतो. मराठा आरक्षण समितीत मी महत्त्वाचं काम केलेलं आहे. जे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने खंडपीठाकडे पाठवण्याची विनंती केली, ती पाठवत असताना आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यात आली’; असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘मराठा आरक्षणाप्रमाणेच तमिळनाडूचाही सारखाच विषय होता. त्याचसोबत केंद्र सरकारने ईजब्ल्यूएस 10 टक्क्याचं आरक्षण आहे, ते खंडपीठाकडे पाठवताना अंतरिम स्थगिती दिली नाही. मग मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याचा जो अनपेक्षित निर्णय झाला आहे, तो आपल्या सर्वांना माहितच आहे.’
Read Also :
सूडाच्या मार्गाने जाण्यास आम्हाला भाग पाडू नका, मुख्यमंत्र्यांचा भाजपला इशारा
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर देहविक्री करणाऱ्या महिलांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा