मीरा – भाईंदर मतदारसंघातील अपक्ष आमदार गीता जैन या आता शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेचे ताकद वाढण्यास मदत होणार आहे. भाजपमध्ये बंडखोरी करत त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. भाजपच्या त्या माजी महापौर होत्या. त्यामुळे भाजपला अजून एका धक्क्याला सामोरे जावे लागणार आहे.
गीता जैन आधी भाजपमध्ये होत्या. त्यांनी भाजपच्या तिकिटावर मिरा भाईंदर मनपात निवडणूक जिंकून २०१५ मध्ये महापौर पद मिळवले होते. राज्यात २०१९च्या विधानसभा निवडणुकीवेळी सत्तेचे गणित सांभाळण्यासाठी गीता जैन यांना भाजपमधून बाहेर पडून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आला. भाजपचे अधिकृत उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव करुन ही निवडणूक जिंकल्यानंतर आपल्याला मिरा-भाईंदरमध्ये भाजपचे नेतृत्व मिळेल अशी आशा गीता जैन यांना वाटत होती. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा दिला होता. प्रत्यक्षात भाजपने अद्याप नेतृत्व बदल केलेला नाही. याच कारणामुळे गीता जैन यांनी शिवसेनेची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनामुळेच मिरा-भाईंदर भाजपचे नेतृत्व नरेंद्र मेहता यांच्याकडे कायम असल्याची चर्चा भाजपमध्ये आहे. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देणाऱ्या गीता जैन यांनी सेनेत प्रवेश केल्यास भाजपचे मिरा-भाईंदरमधील गणित नक्कीच बिघडण्याची शक्यता आहे अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.