काल देशभरात राम मंदिर उभारणीचा सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. पुणे तसेच पिंपरी चिंचवड भागात देखील हा आनंदोत्सव पहायला मिळाला. पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या समर्थकांसह हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केल्याचे पहायला मिळाले. या निमित्त अनेक जुन्या आठवणींना देखील उजाळा मिळाला.
विशेष म्हणजे 1990 साली शिलान्यासाचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड शहराचा ज्या मंदिरात झाला होता आणि कारसेवेचे नियोजन ज्या मंदिरात करण्यात आले होते असे चिंचवड गावातील श्रीराम मंदिर येथे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.भक्तिमय वातावरणामध्ये सर्वांनी जय श्री रामच्या घोषात प्रभू रामचंद्राचे स्मरण केले.1990 साली देखील हे मंदिर असेच श्री रामाच्या जयघोषाने दुमदुमून गेल्याची आठवण यावेळी अनेक जाणकारांनी सांगितली.
या प्रसंगी 1990 मध्ये पिंपरी चिंचवडचे कारसेवेचे नियोजन पाहणारे हेमंत राव हरहरे हे देखील उपस्थित होते.तीस वर्षानंतर राम मंदिराचा पायाभरणी सोहळा झाला हा खूप आनंदाचा क्षण आहे तसेच ज्या कारसेवकांनी यासाठी बलिदान दिल त्या बलिदानाला आज कुठं तरी मूर्त स्वरूप प्राप्त झाले असल्याच्या भावना हेमंत राव हरहरे यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या. तसेच ही केवळ राम मंदिराची पायाभरणी नसून, यातून देशामध्ये दुरिताचें तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्यें पाहो || जो जे वांछील तो ते लाहो या अर्थाला अनुसरून असे रामराज्य येणार असल्याचे देखील हरहरे यांनी यावेळी सांगितले.