कोल्हापूर: महाराष्ट्रात कोल्हापुर जिल्हा दूध संघ गोकुळ निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. रविवारी दूध संघासाठी मतदान होणार आहे. शेवटच्या टप्प्यात आता राजकारणाला ऊत आला आहे. गोकुळच्या निवडणुकीत आज आमदार प्रकाश आवाडे यांनी सत्तारुढ गटाचे नेते आमदार पी . एन . पाटील, माजी आमदार महादेवराव महाडीक, धनंजय महाडीक यांच्या उपस्थितीत आवाडे यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी पाठिंबा जाहीर केला . या वेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे हेही उपस्थित होते.
गोकुळ दुध संघाचे काम अत्यंत व्यवस्थित आणि सुरळीत सुरू आहे. सहकार क्षेत्रातील एक आदर्श संस्था म्हणून हा संघ देशभर नावाजला जातो. सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ संघाने मोठी भरारी घेतली आहे. विशेष म्हणजे अडचणीच्या काळात जेव्हा संपूर्ण राज्यात दुधाचे दर कमी झाले होते, त्यावेळी सत्तारुढ गटाने दुधाचा खरेदी दर कमी न करता उत्पादकांना पाठबळ दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर गोकुळच्या विकासाचा वेग कायम रहावा, यासाठी सत्तारुढ राजर्षि शाहू आघाडीला पाठींबा देत असल्याचे आमदार प्रकाश आवाडे जाहीर केले आहे. MLA Prakash Awade backs ruling Mahadik faction in Gokul polls
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र कार्यरत राहू, असे धनंजय महाडिक यांनी सांगितले. सत्तारुढ गटाला दूध उत्पादक सभासद आणि महत्त्वाच्या नेत्यांचे पाठबळ मिळत असल्याने, सत्तारुढ गटाची स्थिती भक्कम बनल्याचे स्पष्ट दिसते, तर विरोधी आघाडीत बिघाडी झाल्याचा दावा महाडीक यांनी केला. जेव्हा संपूर्ण राज्यात दुधाचा दर उतरला होता, त्यावेळी गोकुळ दुध संघाने मात्र सभासदांकडून, ठरलेल्या दरानेच दूध खरेदी केले होते. ही बाब दूध उत्पादक सभासद कधीही विसरणार नाहीत. आवाडे गटाच्या पाठींब्यामुळे सत्तारुढ गटाला आणखी बळ मिळाल्याची प्रतिक्रिया आमदार पी.एन.पाटील यांनी व्यक्त केली.