मुंबई : सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण मिळाल्यानंतर आता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे मुलगा विहंगसोबत उद्या ईडीसमोर हजर होणार आहे. प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक उद्या सकाळी 11 वाजता ईडी समोर हजर होणार आहे.
ईडीच्या पथकाने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर ईडीने चौकशीसाठी प्रताप सरनाईक यांना वारंवार नोटीसा बजावल्या होत्या. अनेकदा समन्स बजावल्यानंतरही सरनाईक यांनी मुदत मागितली होती. आता अखेर 2 आठवड्यांनी ते ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत.
काल सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आले असताना, ईडा-पिडा टळो यासाठी देवाकडं गाऱ्हाणं घातलं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिले असून, ईडी सरनाईक कुटुंबाला चौकशीसाठी बोलवू शकते. मात्र त्यांना अटक करु शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्याबाबत 24 नोव्हेंबर रोजी ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाकडून संरक्षण मिळाल्यानंतर ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत.