बीड – राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी महाविकासआघाडी मधील काही मोठ्या मंत्र्यांना थेट इशारा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा थेट चॅलेंज दिलं आहे. तर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना देखील निर्वाणीचा इशारा दिला आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड शुगर साखर कारखान्याला आकसापोटी परवानगी दिली नाही असा आरोप केला आहे. गंगाखेड शुगरने सरकारने घालून दिलेल्या अटी पूर्ण केल्या आहेत. एफआरपीनुसार शेतकऱ्यांना पेमेंट देण्यात आलं. कारखान्याला ऊस घातल्यानंतर 15 दिवसांत शेतकऱ्यांना त्यांचे पैसे दिले. तरीही राजकीय आकसापोटीच गंगाखेड शुगरला गाळपास परवानगी दिली नाही, असा आरोप आमदार गुट्टे यांनी केला आहे.
गंगाखेड शुगरला ज्या अटी लावल्या आहेत, त्या तुमच्या कारखान्याला का नाहीत? असा सवाल गुट्टे यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर सरकारने लावलेल्या अटीनुसार राज्यातील एकही कारखाना सुरु होणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. ‘उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना चॅलेंज आहे. त्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं’, असं आव्हानच गुट्टे यांनी दिलं आहे.