मार्च महिण्यामध्ये सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांना फटका बसल्याचे आढळून आले. त्यामुळे शासनाने काही मर्यादा घालून अनेक व्यवसायांना परवानगी दिली मात्र अजूनही काही व्यवसायांना पूर्णपणे सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. जिम हा त्या पैकीच एक आहे. याच अनुषंगाने जिम व्यवसायही चालू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जिम चालक आणि मालकांनी केली आहे. मात्र तरी देखील सरकारकडून जिम सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जात नाही. याच पार्श्वभूमिवर आज जिमचालकांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची निवास्थानी जाऊन भेट घेतली.
काय म्हणाले नेमकं राज ठाकरे
सर्व नियमांचे पालन करुन जिम व्यवसाय सुरु करण्यासाठी आम्ही तयार असल्याचे जिम चालकांनी राज ठाकरेंना सांगितले. यानंतर तुम्ही जिम सुरु करा. जिम सुरु केल्यानंतर कोण कारवाई करतंय बघू, असं राज ठाकरेंनी सांगितले. तसेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही माझं बोलणं झालं. त्यांचंही म्हणणं आहे की जिम सुरु झालं पाहिजे. आता मी सांगतोय जिम सुरु करा, ज्याला यायचं आहे, तो जिमला येईल. बघू काय होतंय, असे राज ठाकरे जिम चालक-मालक यांच्या भेटीनंतर म्हणाले.
केंद्र सरकार सांगतं जिम सुरु करा, विमानतळ सुरु करायला सांगितलं, राज्य म्हणतं आम्ही नाही करणार, मग तुम्हाला काही वेगळी अक्कल आहे का, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच जिम सुरु केल्यानंतर प्रत्येक जण आपली काळजी घ्या, प्रत्येकाची काळजी घ्या. केंद्राने गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्या पाळून काळजी घ्या असे आवाहन देखीर राज ठाकरे यांनी केले आहे.
सर्व व्यवसायांना आता परवानगी मिळालेली असताना जिम अद्याप सुरु झालेल्या नाहीत त्यामुळे जिम व्यावसायिकांमध्ये मोठे नाराजीचे वातावरण आहे.त्याच अनुषंगाने जीम व्यावसायिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतलेली बैठक महत्वाची मानली जात आहे.