अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी कोरोनावर मात केली असून प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. मात्र, जरी डिस्चार्ज मिळाला असला तरी त्यांना पुढील २० दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे.
नवनीत राणा यांना ६ ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते . सुरुवातीला अमरावतीतील घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, पाच दिवसानंतरही प्रकृतीत काहीच सुधारणा न झाल्याने त्यांना नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्यांना नागपूरमधील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागपूरमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांच्या प्रकृती अधिकच खालावली होती. त्यानंतर नवनीत राणा यांना तातडीनं मुंबईला हलवण्यात आलं होतं. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी त्यांना आयसीयूतून सर्वसाधारण कक्षामध्ये शिफ्ट करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काल रात्री त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.