बीड – भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारख्यान्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वैद्यनाथ साखर कारखान्याच्या वर्कशॉप आणि स्टोअरमधून तब्बल ३७ लाख ८४ हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या वर्षीपासून वैद्यनाथ कारखाना बंद होता, तर यावर्षी मार्चमध्ये लाॅकडाऊन सुरू झाल्यामुळे देखील अनेक महिने कारखाना बंद होता. दरम्यान, १७ आॅक्टोबर रोजी स्टोअर किपर यांना कारखान्याच्या मागील बाजूचे शटर उचकटल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती कारखान्याचे लिपीक आणि इन्चार्ज यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यानंतर कारखाना प्रशासनाने तपासणी करून नेमकं काय काय चोरीला गेलं याचा शोध घेतला. या चोरीत एकूण ३७ लाख ८४ हजार रुपयांचे साहित्य लंपास करण्यात आले आहे. त्यात कारखान्याचे संगणक, कपर मटेरियल, मिल बेअरिंग, बुश साऊंड बार अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे.
लाॅकडाऊनचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी वैद्यनाथ कारखान्यात मोठी चोरी केल्याचे समोर आलेे आहे. या प्रकरणात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. कारखान्यात चोवीस तास सुरक्षा रक्षक तैनात असतांना ही चोरी झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.